Follow us on Twitter

चित्रपट गीते

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा


गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर 
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)



शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
नाटक - सन्यस्तखड्ग (१९३१)



तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !

तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे !
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !

कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?
नदी न्याहळी का कधी सागराला ?
तिच्यासारखी मी सदा वाहते !


गीत - ग. दि, माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - जगाच्या पाठीवर (१९६०)



मधु इथे अन्‌ चंद्र तिथे, झुरतो अंधारात
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात
संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर, वाऱ्यावरची वरात
वाऱ्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात


गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - आशा भोसले, महेंद्र कपूर
चित्रपट - मधुचंद्र (१९६७)



--= NFSP =--

सावध हरिणी सावध ग, करील कुणी तरी पारध ग

रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी
घातक तुजला तुझी मोहिनी, सावध

उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे
थरथर काळीज हलते रमणी, सावध

मादक धुंदी तुझीच सजणी, दिशात भरली नभात चढली
मोहाच्या क्षणी झापड नयनी, सावध


गीत - पी. सावळाराम
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - जयवंत कुलकर्णी
चित्रपट - माय माउली (१९७१)